रस्ता सुरक्षा अभियानाचे उदघाटन : 31 जानेवारीपर्यंत अभियान जीवन मूल्यवान आहे ; वाहतुकीचे नियम पाळा व अपघात टाळा — जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
10/01/2025 - 10/02/2025
मानवी जीवन मूल्यवान आहे, त्यामुळे रस्त्यावरुन वाहन चालविताना सुरक्षितपणे वाहन चालवा. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळल्यास अपघात व अपघातामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण निश्चितपणे कमी होईल. जबाबदार व्यक्ती म्हणून सर्वांनी स्वत:पासून सुरुवात करा आणि वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या उदघाटनप्रसंगी केले.
परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात आज रस्ता सुरक्षा अभियान-2025 चे थाटात उदघाटन झाले. कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी (नांदेड) विनय अहिरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमवाड, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव, श्री. तडवी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर आदी मान्यवरांसह एनसीसीचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
दैनंदिन जीवनात होत असलेल्या अपघातांमुळे दररोज मोठी जीवीत व वित्तहानी होत आहे. वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसवा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा याकरीता दरवर्षी संपूर्ण देशभरात केंद्र शासन व राज्यशासनामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते.
दि. 31 जानेवारी 2025 पर्यंत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे उदघाटन आज परभणीत झाले.
जिल्हाधिकारी श्री. गावडे म्हणाले की, वाहनाच्या वेगापेक्षा मानवी जीवनाची सुरक्षा महत्त्वाची आहे. अनेकजण वाहन चालविताना मोबाईलवर बोलताना दिसतात. चारपदरी रस्त्यांवर दुचाकीस्वार मोठ्या वाहनांच्या लाईनमधून बिनधास्त वाहन चालवितात. अशा पध्दतीने वाहन चालविणे हे मृत्यूस कारणीभूत ठरु शकते. अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबियांची अवस्था समजून घ्या. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हायला हवे. त्यासाठी सर्वांनीच मानसिकता बदलणे आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम पाळा व वाहन जपून चालवा.
पोलीस अधीक्षक श्री. परदेशी म्हणाले की, सर्वच वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याबरोबरच दुचाकीस्वारांनी प्राधान्याने हेल्मेटचा वापर करावा. मोबाईलला इजा होऊ नये म्हणून आपण काळजीने जसे स्क्रीनगार्ड लावतो, त्याचप्रमाणे आपल्या मेंदुला इजा होऊ नये म्हणून हेल्मेटचा अवश्य वापर करावा.
श्री. अहिरे म्हणाले की, रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावे आणि नागरिकांना वाहतुक नियमांची माहिती व्हावी यासाठी रस्ता सुरक्षा अभियान दरवर्षी प्रत्येक जिल्हयात राबविण्यात येते. या अभियानामार्फत करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे अपघाताच्या टक्केवारीत निश्चितपणे घटही दिसून येते. अपघात होऊच नये म्हणून वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम अवश्य पाळावेत. अत्याधुनिक तंत्राव्दारे अनेक ठिकाणी आता आपल्या वाहनाच्या वेगावरही लक्ष ठेवले जात आहे, त्यामुळे वाहनाचा वेग मर्यादित ठेवा. हेल्मेटचा वापर करा. चारचाकी वाहनात सीटबेल्टचा वापर अवश्य करा.
डॉ. लखमवाड यांनी तरुणांना सल्ला देताना सांगितले की, रस्यायावर स्टंटबाजी करु नका. आपल्या घरी कोणीतरी आपली वाट पाहत असते, याचे भान ठेवा. प्राचार्य जाधव यांनी आपली सुरक्षा आपल्या हातात असल्याचे सांगून वाहने जपून चालविण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविक श्री. पाराशर यांनी केले. यावेळी वाहतुक सुरक्षा संबंधी विविध पुस्तिका व माहितीपत्रकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. शेवटी सर्वांना रस्ता सुरक्षेचे शपथ देण्यात आली. यानंतर महाविद्यालयाच्या परिसरात कृषी विभागातील मंडळ कृषि अधिकारी (वृक्षमित्र) कैलास गायकवाड यांनी लोकसहभागातून वृक्षलागवड व संवर्धन कार्यक्रमातंर्गत आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर हेल्मेट रॅलीला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
***