Seva Sankalp Abhiyan from 8th April to 10th April in Selu Dist. Parbhani
सेलू येथे 8 एप्रिलपासून सेवा संकल्प अभियान
10 एप्रिल रोजी भव्य महाआरोग्य शिबिर
नागरिकांनी सेवा संकल्प अभियानाचा अवश्य लाभ घ्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
-अभियानात लोककल्याणकारी योजनांचे माहिती देणारे स्टॉल
– विविध मान्यवरांच्या चर्चासत्राचे आयोजन
– विकासकामांचा लोकार्पण सोहळा
– महाआरोग्य शिबीरात केली जाणार विविध आजारांची तपासणी
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच शासकीय विभाग अधिक लोकाभिमुख करण्याकरीता दि. 8 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात सेवा संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांच्या माहितीचे स्टॉल, उत्पादक पुरवठादार कंपन्याचे उत्पादने, प्रात्यक्षिके, जनसंवाद, महाआरोग्य शिबीर असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत, याचा लाभ नागरिकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे रुपरेषा पुढील प्रमाणे आहे. सेवा संकल्प अभियानाचे उद्घाटन 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता होणार आहे. दुपारी 2.30 वाजता महिला व बालविकास विभागाशी निगडीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 9 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वाजता परभणी जिल्ह्यातील विविध विकास कामांचा ई-भुमीपुजन / ई-लोकार्पण कार्यक्रम, दुपारी 02.30 वाजता शेतकरी मार्गदर्शन चर्चासत्र होणार आहे.
दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 10.00 वा. महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 11.00 वा. सेलू येथील महावितरण विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रराजे भोसले, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर, सार्वजनिक आरोग्य व कुंटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहूल पाटील, आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार सतिश चव्हाण, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, छत्रपती संभाजीनगर महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक राहूल गुप्ता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सदानंद भिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी राहूल गिते यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती सेलू येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांनी दिली. यावेळी पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी राहूल देशपांडे, मेघराज देवरे, तहसिलदार शिवाजी मगर आदी उपस्थित होते.