Revenue Day 2025
महसूल सप्ताहाच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
महसूल सप्ताह यशस्वीपणे राबविण्यात येणार – जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
7 ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह
महसूल सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करुयात, असे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महसूल सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
महसूल दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सभागृहात आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, अनिता भालेराव, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जीवराज डापकर, संगीता चव्हाण, शैलेश लाहोटी, तहसिलदार डॉ. संदीप राजापुरे एनआयसीचे देवेंद्रसिंह आदींसह महसूल विभागाचे अधिकारी, कमर्चारी उपस्थित होते.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, महसूल विभागामार्फत दि. 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांसाठी विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आपल्या जिल्ह्यात हा सप्ताह प्रभावीपणे राबवून सर्वसामान्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारत तर त्याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्र-2047 चे स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमात आपण सर्वजण सहभागी होवूयात आणि देश व राज्यासह आपल्या परभणी जिल्ह्याला विकासात अग्रेसर करुयात. महसूल कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करण्याची उत्तम संधी मिळाली आहे, या संधीचा लाभ घेऊन कर्मचाऱ्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत शासनाचे लोककल्याणकारी उपक्रम पोहोचवून त्यांना योजनांचा लाभ द्यावा. तसेच मुख्यमंत्री यांनी दिलेल्या दीडशे दिवसांच्या कार्यक्रमाची जिल्ह्यात यशस्वीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही पालकमंत्री यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकरी रघुनाथ गावडे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा देत महसूल सप्ताह यशस्वीपणे राबविण्याचे आवाहन केले. श्रीमती ढालकरी यांनी प्रास्ताविकात जिल्हा प्रशासनाने मागील वर्षात केलेल्या यशस्वी कामांचा लेखाजोखा मांडला व महसूल सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी, उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महसूल सप्ताहनिमित्त 7 आगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन
महसूल विभागाने यावर्षी महसूल दिनापासून दिनांक 1 ते 7 ऑगस्ट, 2025 या कालावधीत राज्यभरात “महसूल सप्ताह-2025” साजरा करण्यात यावा अशी सुचना दिली आहे. परभणी जिल्हयात महसूल विभागातर्फे दि. 07 ऑगस्ट, 2025 पर्यंत खालीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 3 ऑगस्ट-“पाणंद/शिवरस्त्यांची मोजणी करुन त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे” – विशेष कार्यक्रमाचे आयोजन- स्थळ-तहसिल कार्यालय, पूर्णा.
4 ऑगस्ट-छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविणे -विशेष कार्यक्रमाचे आयोजन- स्थळ-तहसिल कार्यालय, पाथरी.
5 ऑगस्ट-“विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करुन डीबीटी करुन अनुदानाचे वाटप करणे-विशेष कार्यक्रमाचे आयोजन- स्थळ-तहसिल कार्यालय, परभणी.
6 ऑगस्ट -“शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणमुक्त करणे तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार (नियमानुकूल करणे/सरकारजमा करणे) निर्णय घेणे”विशेष कार्यक्रमाचे आयोजन- स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी.
7 ऑगस्ट -एम-सॅन्ड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ” विशेष कार्यक्रमाचे आयोजन- स्थळ-तहसिल कार्यालय, गंगाखेड.
उपरोक्त नमुद केल्याप्रमाणे संबंधित कार्यालय व्यापक स्वरुपात कार्यक्रमाचे आयोजन करणार असून परभणी जिल्हयातील इतर तहसिल व उपविभागीय अधिकारी कार्यालयही उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. सदर महसूल सप्ताहामध्ये महसूल विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा, नागरिकांमध्ये त्याबाबत जागरुकता वाढावी,यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महसूल सप्ताहामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.