E-Peak Pahani’ special campaign on 27th and 28th February in Parbhani district
परभणी जिल्ह्यात 27 व 28 फेब्रुवारी रोजी ‘ई पीक पाहणी’ विशेष मोहीम
राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प राबविण्यात येत असून परभणी जिल्ह्यात येत्या गुरुवारी (दि. 27 फेब्रुवारी) आणि शुक्रवारी (दि.28 फेब्रुवारी) या दोन दिवशी ई-पीक पाहणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 69 हजार 600 शेतकऱ्यांची नोंदणी करून घेण्याची सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली आहे. .
1 डिसेंबर 2024 पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम 2024 सुरु करण्यात आले आहे. ज्यामध्ये दि. 16 जानेवार 2025 पासून सहायक स्तरावरून मोबाईल ॲपव्दारे ई-पीक पहाणी नोंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दि. 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत सहायक स्तरावरुन मोबाईल ॲपव्दारे पीक नोंदणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
डिजीटल क्रॉप सर्वे अंतर्गत शंभर टक्के ई-पीक पहाणी नोंद करणे बंधनकारक आहे. रब्बी हंगामात शेतात उभे असलेले पीक, कायम पड अथवा चालू पड असलेल्या जमिनींची नोंद करणे आवश्यक आहे . तरी शेतकरी स्तरावरुन पीक नोंदणी न केलेल्या सर्व शेतजमिनींची शंभर टक्के ई-पीक पहाणी मोबाईल ॲपव्दारे सहायक स्तरावरुन पूर्ण करावी.
त्यानुषंगाने शेतक-यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅप्लिकेशनमध्ये शेतातील पिकांची माहिती सहाय्यकामार्फत गाव नमुना नं 7/12 वर नोंदविण्यासाठी दिनांक 27 फेबुवारी 2025 व दिनांक 28 फेबुवारी 2025 रोजी मोहिम स्वरुपात प्रत्येक गावातील किमान 200 शेतक-यांची नोंदणी पूर्ण करण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. परभणी जिल्ह्यात एकूण 848 गावे असून प्रत्येक गावातील किमान 200 शेतक-यांची नोंदणी पूर्ण केल्यास 1 लाख 69 हजार 600 पर्यंत उदिष्ट या मोहिमेच्या दिवशी साध्य होणार आहे.
संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी मोहिमेच्या दिवशी दिनांक 27 फेब्रुवारी 2025 व दिनांक 28 फेबुवारी 2025 रोजी प्रत्येक दोन तासांनी मोहिमेचा आढावा घ्यावा व जिल्ह्यात 1 लाख 69 हजार 600 शेतक-यांचा सहाय्यकामार्फत पीक पेरा नोंदणी पूर्ण करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली आहे.