Close

परभणीकरांसाठी एक विशेष आणि अभिमानास्पद आवाहन!

 

fedf

चला, आपल्या परभणीच्या बाप्पाला नेऊया सातासमुद्रापार… जागतिक वारशाच्या दिशेने!

प्रिय परभणीकर नागरिकांनो, आपल्या महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता असलेल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने आता राज्य महोत्सव म्हणून दर्जा दिला आहे. आपल्या या गौरवशाली परंपरेला जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि युनेस्कोचा (UNESCO) वारसा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी राज्य शासनाने एक व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या ऐतिहासिक प्रवासात परभणी जिल्ह्याचे योगदान महत्त्वपूर्ण ठरावे, यासाठी हे विशेष आवाहन!

Bappa.org – महाराष्ट्राच्या गणेशपरंपरेचा अधिकृत सांस्कृतिक दस्तऐवज

सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्त्व संचालनालयामार्फत Bappa.org हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ही मोहीम केवळ शासनाची नसून ती एक व्यापक लोकचळवळ आहे.

आपण काय करू शकता?

तुमच्या घरगुती किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे दस्तऐवजीकरण आता तुम्ही स्वतः करू शकता! खालील बाबींची माहिती, छायाचित्रे (Photos) व व्हिडिओ (Videos) 

WhatsApp च्या माध्यमातून Bappa.org वर अपलोड करा:

  • श्रींची प्रतिष्ठापना आणि वैशिष्ट्यपूर्ण घरगुती परंपरा
  • आकर्षक सजावट आणि हस्तकला
  • चालीरीती, पूजाविधी आणि कौटुंबिक विधी
  • खाद्यपरंपरा (नैवेद्य, मोदक इ.)
  • कला सादरीकरण आणि बाप्पाच्या जुन्या आठवणी
  • संगीत

तुमच्या योगदानाचा सन्मान:

या उपक्रमात अभिमानाने आपली नोंदणी करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र शासनातर्फे अधिकृत ‘Digital Cultural Preserver Certificate’ (डिजिटल कल्चरल प्रिजर्व्हर सर्टिफिकेट) देऊन गौरविण्यात येणार आहे!

कोणी सहभाग घ्यावा?

  • घरोघरी बाप्पाची स्थापना करणारे सर्व नागरिक.
  • पारंपरिक मूर्तिकार, कारागीर आणि लोककलावंत.
  • गृहनिर्माण संस्था (Housing Societies)
  • ग्रामपंचायती आणि महिला बचत गट.

आजच सहभागी व्हा!

स्थानिक कला, संस्कृती आणि आपल्या परभणीचे लोकजीवन जगासमोर मांडण्याची ही सुवर्णसंधी आहे. आजच Bappa.org या संकेतस्थळाला भेट देऊन आपल्या बाप्पाच्या परंपरांची नोंदणी करा!

चला, आपल्या परभणीचा गणेशोत्सव जगाच्या नकाशावर कोरूया!

 जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, परभणी

(जिल्हा प्रशासन, परभणी)