विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६
* विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) ही मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करून त्या अचूक, शुद्ध व अद्ययावत करण्याची महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे.
* या प्रक्रियेद्वारे विद्यमान मतदार यादीतील प्रत्येक मतदाराच्या नोंदीची पडताळणी केली जाते.
* २००२ नंतर व्यापक स्वरूपात अशी प्रक्रिया झालेली नसल्याने विद्यमान मतदार नोंदींची सखोल पडताळणी करणे आवश्यक आहे.
* शहरीकरण, शिक्षण, रोजगार व इतर कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरण झाले असून, त्यामुळे अनेक मतदारांच्या पत्त्यात व इतर तपशीलांमध्ये बदल झाले आहेत.
* मृत व्यक्तींची, अपात्र व्यक्तींची तसेच दुबार नोंद झालेली नावे मतदार यादीतून वगळणे आवश्यक आहे.
* स्थलांतरित झालेल्या मतदारांच्या नोंदींची योग्य पडताळणी करून चुकीच्या ठिकाणी असलेल्या नोंदी अद्ययावत करणे आवश्यक आहे.
* प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट आहे आणि त्याची नोंद योग्य मतदारसंघात व योग्य तपशीलांसह आहे, याची खात्री केली जाते.
* पात्र मतदाराचे नाव अनावश्यकपणे वगळले जाणार नाही तसेच त्याचा मतदानाचा अधिकार अबाधित राहील, याची काळजी घेतली जाते.
* मतदारांच्या नाव, पत्ता, वय आणि इतर आवश्यक तपशीलांमधील चुका दुरुस्त करण्याची संधी मिळते.
* नवीन पात्र नागरिकांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया उपलब्ध करून दिली जाते.
* विशेष सखोल पुनरीक्षणामुळे निर्दोष, पारदर्शक व विश्वासार्ह मतदार यादी तयार करण्यास मदत होते.
* अचूक मतदार यादीमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यास मदत होते.
* मतदार यादीतील अनावश्यक व अपात्र नोंदी कमी झाल्यामुळे मतदार यादीची गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढते.
* प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा हक्क सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी पुनरीक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.
* नागरिकांनी आपले नाव, पत्ता व इतर तपशील मतदार यादीत योग्य प्रकारे नोंदले आहेत की नाही, याची स्वतः पडताळणी करावी.
* आवश्यक असल्यास नागरिकांनी नवीन नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल किंवा इतर संबंधित बदलांसाठी निर्धारित प्रक्रियेनुसार अर्ज करावा.
* विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ चे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुनिश्चित करताना शुद्ध, अचूक, अद्ययावत आणि विश्वासार्ह मतदार यादी तयार करणे.